
सामान्यांसाठी पाणपोई आवश्यकच
बाभुळगाव वार्ता / प्रतिनिधी
पूर्वी उन्हाळा आला की तहानलेल्यांची तहान भागविण्यासाठी सामाजिक कार्याचे भान ठेवत सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वःखर्चाने पाणपोई सुरू करत असायचे. परंतु, अलीकडच्या काळामध्ये सर्वत्र जार व पॅकबंद बॉटल विकल्या जात आहेत. त्यामुळे सध्या पाणपोईच गायब होत चालली आहे.तहान भागविण्यासाठी पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे पूर्वीच्या काळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या संस्था, संघटना व दानशूर व्यक्ती सामाजिक सेवेचे भान जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत होते. त्यासाठी बाभुळगाव बसस्थानकासह, ऑटो पाँइंट ठिकठिकाणी चौकात, शासकीय कार्यालयात, रहदारीच्या रस्त्यावर तसेच आठवडी बाजार या ठिकाणी माठाची पाणपोई उभारत असत. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्यांना पाणपोईने चांगली सोय होत होती. विशेषतः उन्हाळ्यात यावर मोठा भर दिला जात होता.सध्या हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी विकत घेऊन पिणार्यांची संख्या वाढली आहे. पाण्याची बॉटल विकत घेऊन पाणी पिणे आजकाल फॅशन झाली आहे. परंतु, ज्यांना बाटलीबंद पाणी विकत घेणे शक्य नाही अशागोरगरिबांचे उन्हाळ्यात हाल होत आहेत. अशांना सहज पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. यामुळे विविध मंडळे, दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन पानपोई पुन्हा सुरू करून तहानलेल्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची आता नितांत गरज वाटत आहे.अशी होती पाणपोईची रचनापूर्वीच्या काळी घराबाहेर पडल्यानंतर कुठे रांजण माठ लाल रंगाचा ओला कपडा झाकलेला असायचा. त्याचबरोबर पाणी पिण्यासाठी रंगबिरंगी प्लास्टिकचे ग्लास असत. अशी ही पाणपोई असायची. त्या रांजणामधील नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले पाणी पिले की तहानच भागायची; परंतु कालांतराने संकल्पनाच बदलली, पाणपोईची जागा सध्या पाणपोई थंड पाण्याच्या जारने घेतली. पाणपोईचा प्रवाससार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोई सुरू करत. पुढे नातेवाइकांच्या स्मरणार्थ पाणपोईंची भर पडत गेली. त्यापुढील काळात राजकीय मंडळींनी स्वतःच्या जाहिरातरुपी समाजसेवेचा वसा पाणपोईच्या माध्यमातून घेतला. काळानुरूप पाण्याचा ‘व्यापार’ सुरू झाला. पाणपोईंची जागा जार व बाटलीबंद पाण्याने घेतली. जार व बाटलीबंद पाण्याच्या जमान्यात पाणपोई “गायब’ होत गेली. आता हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच रांजणातील पाणपोईंची संख्या उरली आहे. यामुळे कुंभारवाड्यातून रांजण बनवणेही जवळपास थांबले आहे.
