
बाभुळगाव वार्ता/प्रतिनिधी
तालुक्यातील हस्तापूर शेत शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. हि घटना २८ फेब्रुवारीच्या सायंकाळी ७ वाजताचे सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर इसमाने तीन-चार दिवसा आधी गळफास घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी हस्तापूर चे पोलीस पाटील विक्रम चौधरी यांनी फिर्याद नोंदविली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, हस्तापूरचे पोलीस पाटील चौधरी यांना मो. जुबेर मो. खलील रा. मिटणापूर यांनी फोन करून सांगितले की, त्यांच्या शेतीला लागून असलेल्या अविनाश मडावी रा.हस्तापूर यांचे शेतात एका अनोळखी इसमाने फाशी घेतली असून त्याचे पूर्ण शरीर कुजलेल्या स्थितीत दिसत आहे. व परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. यावरून चौधरी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व माहिती पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनांस्थळी जाऊन पाहणी केली असता शेतामधील धु-र्यावर असलेल्या पळसाच्या झाडाला अंदाजे वय 35 ते 40 वर्षे असलेल्या इसमाने फाशी घेतलेले आढळून आले. प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याने ओळखायला येत नसल्याने प्रेताची ओळख पटू शकली नाही. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला.