
बाभुळगांव वार्ता प्रतिनिधी
नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घरपोच मिळावा, या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर हे अभियान संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार आहे. तहसिल कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील पाच विविध मंडळांमध्ये ही शिबिरे भरविण्यात येणार आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून ४ मार्च रोजी येथील तहसिल कार्यालयात तहसिलदार मिरा पागोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शिबिराच्या नियोजनाबाबत, स्टॉल व्यवस्थापनाबाबत तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली
तहसिल कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार वेणी येथे ७ मार्च, सावर १४ मार्च, घारफळ १० एप्रिल, पहुर १७ एप्रिल व बाभुळगांव येथे ८ मे २०२६ ला या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबीर स्थळी १५ पेक्षा जास्त महसुली सेवा मिळणार आहेत.
या ठिकाणी प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी, अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार ‘सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत केली जाणार आहे.बँकांचेही स्टॉल यावेळी उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांना शिबिराची माहिती व्हावी, यासाठी गावोगावी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्याची सुचना उपस्थितांना देण्यात आली. यामुळे अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ घेता येईल, असा विश्वास तहसीलदार मिरा पागोरे यांनी व्यक्त केला आहे.
विविध विभागांचा सहभाग :-
या शिबिरांमध्ये महसूल विभागा सोबतच पंचायत समिती, नगर पंचायत, भूमी अभिलेख कार्यालय, वीज वितरण कंपनी, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी विभाग, महिला व बालविकास, वन विभाग, उमेद अभियान तसेच
या शिबिरांमुळे तालुक्यातील नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांची माहिती मिळणार असुन, त्यांच्या समस्या जागेवरच सोडविण्यास मदत होणार आहे. नागरिकांनीही या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मिरा पागोरे यांनी केले आहे.