
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बाभुळगाव येथे मटका, जुगार अड्ड्यावर धाड
बाभुळगाव वार्ता/ प्रतिनिधी बाभूळगाव
गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह बसस्थानक परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली. यामध्ये दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी कोपरा मार्गावर करण्यात आली. मात्र, कारवाईत जप्त केलेली प्रत्यक्ष रक्कम आणि पोलीस दप्तरी झालेली नोंद यात मोठी तफावत आहे. यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. रुपेश अशोक गुल्हाणे रा. यवतमाळ, उमेश किसनराव बरडे (४०) रा. मांग सावंगी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, कोपरा मार्गावर मटका काऊंटर सुरु सुरु आहेत. या माहिती वरून पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी संबंधित आरोपी हे मटका, जुगार खेळताना पोलिसांना रंगेहाथ मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी मटक्याच्या पावत्या आणि रोख रक्कम जप्त केली आहे.यादरम्यान घटनास्थळावरून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, पोलिसांनी आपल्या अधिकृत दप्तरी केवळ २ हजार ३३० रुपये आणि मटक्याच्या पावत्या जप्त केल्याची नोंद केली आहे. या रक्कमेतील मोठ्या तफावतीमुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही कारवाई एलसीबीचे अजय डोळे, योगेश गटलेवार, प्रशांत हेडाऊ, शेतुराज मेढवे आणि आकाश सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.
[ बाभुळगाव शहरात अनेक ठिकाणी मटका काउंटर खुलेआम सुरू आहे यामध्ये काही राजकीय पदाधिकारी सक्रिय असल्याची धक्कादायक चर्चा आहे. राजकीय नावाचा आडोसा घेऊन हे अवैध धंदे चालवले जात आहे. यामुळे प्रशासनावरही दबाव असल्याचे बोलले जात आहे. या जुगारामुळे शेतकरी, गरजू नागरिक आणि शालेय विद्यार्थी बळी पडत असून अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत. राजकीय पक्षांशी संबंधित हे मटका काउंटर असल्याने पोलीस त्यावर काय कारवाई करणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.]