
प्रतिनिधी । बाभुळगाव वार्ता
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास धाड टाकून दोन आरोपींना पकडले. या कारवाईत रुपेश अशोक गुल्हाने वय ३०, यवतमाळ व उमेश किशनराव बरडे वय ४०, मांगसावंगी या दोघांना मटका पावतीसह २३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अटक करण्यात आली. या प्रकरणी सहायक फौजदार दीपक आसकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र या घटनेने परिसरात उलटसुलट चर्चांना उधान आले असून या कारवाईत मोठ्या आर्थिक उलाढालीचा संशय व्यक्त होत आहे. बाभूळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत यवतमाळच्या पथकाने कारवाई केल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात बाभूळगाव पोलिसांची अवैध व्यवसायाकडे होणारी डोळेझाक पुन्हा उघड झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ पथकाच्या संयुक्त कारवाईत अजय डोळे, योगेश गटलेवार, प्रशांत हेडाऊ, शेतुराज मेढवे, आकाश सूर्यवंशी यांचा समावेश होता. मात्र हि कारवाई करताना कुणी मोठा अधिकारी सोबत नसल्याचे आढळून आले आहे. बाभूळगाव पोलिसांच्या डोळ्याखाली सट्टा मटक्याची दुकाने खुलेआम सुरु असून स्थानिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई का होत नाही? असा सवाल जनसामान्यात उपस्थित होतो आहे.
{ बसस्थानक चौफुली सट्टा-मटकाचा ‘हॉटस्पॉट’
बाभूळगाव बसस्थानक चौफुली सट्टा, मटका व्यावसायिकांसाठी ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काउन्टर उघडलेले असून ग्राहकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळते. एक रुपयाला थेट दहाचा भाव मिळत असल्याने तालुक्याबाहेरील ग्राहक सुद्धा दिवसभर ठिय्या मांडून असतात. रस्त्यालगतच्या शेतात तर आकडेमोड करणाऱ्यांची जत्राच भरलेली पहावयास मिळते. मात्र हा सर्व प्रकार पोलिसांच्या नाकावर टिच्चून केला जातो कि संमतीने (?), हे न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल. सट्टा मटक्यासारख्या सामान्य गुन्ह्यांवरही बाभुळगाव पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.}