प्रतिनिधी | बाभूळगाव :-
रब्बी हंगाम २०२६ मधील हरभरा (चणा) हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे अधिसूचना जरी करण्यात आली आहे. हरभरा (चणा) खरेदीस मंजूरी देण्याकरीता दिनांक ११ फेब्रुवारी, २०२६ रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच, सद्यस्थितीत राज्यात हमीभावाने तूर खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तूर खरेदीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत हरभरा (चणा) खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हंगाम २०२५ – २६ मधील हमीभाव तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. तूर पिकाची हमीभावाने खरेदी प्रक्रिया राबविण्याकरीता केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे. त्यानुसार २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती . आता, सद्यस्थितीत तूरीचा बाजारभाव व शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन नाफेड व एनसीसीएफ यांनी केलेल्या विनंतीनुसार तुरीच्या ऑनलाईन नोंदणीकरिता २४ मार्च, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती बाभूळगाव द्वारे देण्यात आली आहे.
