
बाभुळगाव वार्ता / प्रतिनिधी
बाभुळगावच्या आठवडी बाजाराच्या दिवशी एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी अनुभव नागरिकांना पाहायला मिळाला. शहरातील दिव्यांग जोडप्यांनी आपल्या मधुर आवाजात भावगीतांचा कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे त्यांनी हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य सादर केला. साध्या, गरीब कुटुंबातून आलेल्या या कलाकारांच्या निःस्वार्थ सेवेला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली, तर अनेकांनी स्वेच्छेने आर्थिक मदतही केली. आठवडी बाजाराच्या गजबजाटात इंदिरा चौकातील एका कोपऱ्यात रंगलेल्या या अनोख्या मैफलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दृष्टी नसतानाही आत्मविश्वास आणि सुमधुर गायनाच्या जोरावर त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रेम, आशा आणि जीवनातील संघर्ष यांवर आधारित मराठीतील लोकप्रिय भावगीतांनी वातावरण भारावून गेले. त्यांच्या गायनातून केवळ सूर नव्हे, तर भावना आणि आयुष्याचा अनुभवही प्रकर्षाने जाणवत होता. दिव्यांगत्वामुळे नियमित काम करणे शक्य नसल्याने आम्ही कलेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. लोकांना आनंद देताना आम्हालाही समाधान मिळते. कलेची भूक आणि लोकांचे प्रेम आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे’, असे या जोडप्यांनी सांगितले. आधुनिक संगीताच्या प्रभावाच्या काळातही भावगीतांची परंपरा जपत ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही त्यांनी नमूद केले. या दिव्यांग कलाकारांनी आपल्या कलेतून केवळ मनोरंजनच नव्हे, तर धैर्य, जिद्द आणि सकारात्मकतेचा प्रेरणादायी संदेश समाजासमोर ठेवला आहे.
