
बाभुळगाव वार्ता प्रतिनिधी
बाभूळगाव:- तालुक्यामध्ये होतकरू खेळाडूंची संख्या बरीच मोठी आहे. परंतु क्रीडांगणाच्या अभावी त्यांचे कलागुणांचा विकास त्यांना करता आला नाही. त्यामुळे खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळाला नाही. बाभूळगाव तालुक्याच्या ठिकाणी मोठे व अद्ययावत असे क्रीडासंकुल निर्माण करावे, या मागणीचे निवेदन नगरसेवक अक्षय राऊत यांच्या वतीने दिनांक २ मार्च रोजी नगरपंचायत बाभुळगाव येथे आयोजित तालुका आढावा बैठकी मध्ये पालकमंत्री ना. संजय राठोड यांना देण्यात आले. गरीब, होतकरू, प्रतिभावान खेळाडू, विद्यार्थी यांना आपआपल्या क्षेत्रातील खेळांचा सराव करण्यासाठी, तसेच विविध सैन्य भरती, वन विभाग, पोलीस विभाग भरती करीता शारिरीक गुणवत्तेसाठी सराव करण्याच्या उद्देशाने कुठलेही क्रीडांगण उपलब्ध नाही. याआधी सुद्धा अनेकवेळा शासन दरबारी क्रीडा संकुलासाठी निवेदने देवुन पाठपुरावा केला होता. पंरतु शासनाकडून त्याची साधी दखल घेण्यात आली नाही. सुमारे ६४ ग्राम पंचायती व एक नगर पंचायत असलेल्या बाभूळगाव तालुक्याला विस्तीर्ण असा परिसर लाभला असून लोकसंख्या व जनसंख्येच्या बाबतीत तालुका मोठा आहे. तरीही या ठिकाणी खेळाडूंसाठी हक्काचे क्रीडा संकुल करण्यात आले नाही. यावरून येथील लोकप्रतिनिधी व शासनाची उदासीनता दिसून येते. तालुक्यात क्रीडासंकुल देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.